पुणे : कबुतरांच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथक-२ ने जलद कारवाई करत ४ आरोपींना अटक केली असून त्यांना वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास पवार एन्क्लेव्ह सोसायटी, शंकरमठ परिसरातील मोकळ्या जागेत कबुतरांच्या ढाबळीजवळ एक तरुण संशयास्पदरीत्या उभा असल्याचे काही इसमांना दिसले. कबुतरे चोरी करण्याच्या संशयावरून पाच जणांनी मिळून त्या तरुणाला लाकडी बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.जखमी तरुणाची प्रकृती खालावल्याने आरोपींनी अपघाताचा बनाव करत त्याला अॅम्ब्युलन्समधून ससून रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ससून रुग्णालयात धाव घेतली. तेथे चौकशीदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींनाही त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गौरव विजयकुमार माजी (२२), सचिन विजयकुमार माजी (२३), मोनु विजयकुमार माजी (२६) आणि बंटी विजयकुमार माजी (१८) यांचा समावेश आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.या प्रकरणामुळे किरकोळ संशयावरून वाढणाऱ्या वादांचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले असून परिसरात खळबळ उडाली आहे.