कान्हे (मावळ) : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी CIE Automotive India Ltd., स्टॅम्पिंग्स डिव्हिजन, कान्हे – मावळ येथे कंपनी व्यवस्थापन आणि भारतीय कामगार सेना यांच्यामध्ये तीन वर्षांचा अकरावा वेतन करार यशस्वीपणे पार पडला. या करारामुळे एकूण १२७ कामगारांना लाभ होणार असून, औद्योगिक क्षेत्रात या कराराची विशेष दखल घेतली जात आहे.सदर करार हा १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२८ या कालावधीसाठी लागू असून, कामगारांना एकूण ₹१५,५०० इतकी वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. करार लागू झालेल्या तारखेपासून सर्व आर्थिक फरक देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
करारामध्ये मागील करारातील कॅज्युअल लीव्ह रजा रोखीकरण वगळता इतर सर्व सुविधा पूर्ववत ठेवण्यात आल्या आहेत. तसेच दीर्घ सेवा पुरस्काराची पात्रता २५ वर्षांवरून २० वर्षे करण्यात आली असून, पुरस्काराची रक्कम ₹४,००० वरून ₹६,००० करण्यात आली आहे. यासोबतच दोन इन्क्रिमेंट देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, “मृत्यू अनुदान निधी” अंतर्गत कोणत्याही कर्मचारी किंवा कायमस्वरूपी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, सर्व कर्मचारी व कायम कामगार यांच्या एक दिवसाच्या ग्रॉस पगाराइतकी रक्कम आणि त्याच्याइतकीच कंपनीकडून भर घालून संबंधित कर्मचाऱ्याच्या कायदेशीर वारसांना देण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक तीन वर्षांत एकदा कंपनी लोगो असलेले जॅकेट देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
या करार प्रक्रियेत भारतीय कामगार सेना सरचिटणीस तथा शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कराराचा स्वाक्षरी सोहळा भोसरी येथील CIE इंडिया मॅग्नेट डिव्हिजन येथे उत्साहात पार पडला. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून श्री. लालमणी शुक्ला (सीओओ – स्टॅम्पिंग), श्री. विनायक कडसकर (एच आर हेड – CIE इंडिया ऑपरेशन्स), श्री. सौरभ अग्रवाल (ग्रुप प्लांट हेड – स्टॅम्पिंग), श्री. विशाल मालुसरे (प्लांट हेड – स्टॅम्पिंग, कान्हे), श्री. रविंद्र वैद्य (GM – एच आर व आय आर) तसेच श्री. सागर एन. पवार (हेड – एच आर व आय आर, स्टॅम्पिंग – कान्हे) उपस्थित होते.
कामगार सेनेच्या वतीने अध्यक्ष खा अरविंद सावंत,अजित दादा साळवी, डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यासह स्थानिक युनिटचे पदाधिकारी श्री. रामदास सातकर (अध्यक्ष), श्री. अजय सातकर (सरचिटणीस), श्री. तुषार सातकर (उपाध्यक्ष), श्री. राजेश शेळके (खजिनदार) आणि श्री. सागर यादव (जॉईंट सरचिटणीस) उपस्थित होते. या ऐतिहासिक करारामुळे सर्व कामगारांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या या कराराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
