सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 क्राईम

अशोक खरात प्रकरणात तपास वाढला; रुपाली चाकणकरांसह शिवनिका ट्रस्टच्या विश्वस्तांची चौकशी होऊ शकते

डिजिटल पुणे    23-03-2026 11:58:32

पुणे: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असताना तपासाची व्याप्ती आता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातचे कर्मचारी आणि मंदिरातील पुजाऱ्यांनंतर आता शिवनिका संस्थानच्या विश्वस्तांचीही चौकशी होऊ शकते, असे सूत्रांकडून समोर आले आहे.

माजी विश्वस्त रुपाली चाकणकर यांच्यावरही तपासाची शक्यता आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवनिका संस्थानचे अध्यक्षपद स्वतः अशोक खरातकडे होते. काही वर्षांपूर्वी जुन्या ट्रस्टींनी पद सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली होती. या यादीत खरातने स्वतःच्या पत्नीला समाविष्ट केले होते, तर रुपाली चाकणकरसुद्धा विश्वस्त मंडळावर होत्या.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विश्वस्त मंडळाचा फलक अचानक गायब झाला आहे. रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच सांगितले होते की त्यांच्या कार्यकाळाची मुदत ऑगस्ट 2025 मध्ये संपली आहे. तरीही, फलक गायब होण्याच्या घटनेमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून संस्थानमधील आर्थिक व्यवहार, निर्णयप्रक्रिया आणि प्रशासनाची सखोल चौकशी केली जात आहे.

रुपाली चाकणकरांचा राजीनामा

अशोक खरात प्रकरणामुळे आधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. खरातच्या पाद्यपूजेसंदर्भातील फोटो समोर आल्यावर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली गेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

सध्या तपासाची गती वाढली असून, येत्या काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवनिका संस्थानाशी संबंधित सर्व व्यक्तींची भूमिका तपासली जाणार का, हे राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती