सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 जिल्हा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

डिजिटल पुणे    23-03-2026 17:40:01

मुंबई : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ मार्च २०२६ रोजी विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे.

या सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल तीन हजार ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार असून, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कारशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला वेगळी ओळख दिली आहे. त्या गौरवशाली परंपरेत आता ‘राजमाता जिजाऊ’ या नावाची भर पडल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान अधिक समृद्ध झाला आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

नव्या बसेसची ठळक वैशिष्ट्ये :

या बसेसमध्ये ३×२ आसन रचना असून एकूण ५६ आसन क्षमता आहे, जी सध्याच्या बसेसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे.

या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल.या योजनेअंतर्गत पहिल्या ५० बसेस नागपूर येथे दाखल होणार असून, तेथून या नव्या सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे.

‘राजमाता जिजाऊ’ बससेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचा संगम आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित होईल, अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती