सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण-अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची बॉम्बहल्ल्याची चेतावणी, इराणच्या दोन अटींना नकार
  • तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा
 क्राईम

नाशिकमध्ये ‘तुर्की मध’च्या नावाखाली लाखोंची फसवणूक; भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे

डिजिटल पुणे    24-03-2026 10:46:26

नाशिक: नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदूबाबा प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती उघड होत आहे. अशोक खरात याच्याविरोधातील तपासात आता आर्थिक गैरव्यवहारांचे नवे धागेदोरे समोर आले आहेत. चिंचोके, बनावट खडे यानंतर आता “तुर्की मध” विक्रीच्या नावाखालीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

‘शक्तिवर्धक मध’चा बहाणा

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात “तुर्की मध” हा कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करत असे. लैंगिक समस्या दूर करण्यासाठी हा मध प्रभावी असल्याचे सांगून तो उद्योजक आणि काही राजकीय व्यक्तींना लक्ष्य करत होता. या कथित मधाची किंमत ऐकून धक्का बसेल अशी आहे—एका किलोसाठी तब्बल 9 लाख रुपये आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

‘एल्विश हनी’ची बनावट कथा

खरात या मधाला “एल्विश हनी” असे नाव देत असे. हा मध तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमधून मिळतो, अशी बनावट कथा सांगून त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. दुर्मिळतेचा दावा करत या उत्पादनाला अवास्तव किंमत लावली जात होती. मात्र, तपास यंत्रणांना हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचा संशय आहे.

मनी लॉन्डरिंगचा संशय

या व्यवहारांतून मिळालेली मोठी रक्कम त्याच्या ट्रस्टच्या खात्यांमध्ये जमा होत असल्याचेही उघड झाले आहे. या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार झाल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विविध अंधश्रद्धा आणि तथाकथित उपायांच्या नावाखाली मोठे आर्थिक जाळे उभारल्याचे चित्र समोर येत आहे.

गुन्हे वाढतच चालले

अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झाले असून आणखी 3 तक्रारी नव्याने नोंदवण्यात आल्या आहेत. एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचाही गंभीर आरोप समोर आला आहे. धार्मिक विधी, भविष्य सांगणे, लग्न जमवून देणे अशा बहाण्यांखाली महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत.

आज न्यायालयात हजेरी

पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील कोठडीबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती