मुंबई : वर्सोवा येथील आयसीएआर–केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (ICAR–CIFE) येथे “हिलिंग फिन्स – महाराष्ट्रातील पहिले बहुविशेषज्ञ फिश क्लिनिक व मोबाईल फिश केअर युनिट” या प्रकल्पामुळे मत्स्यपालन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व आरोग्य व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध होऊन मत्स्यपालकांना मोठा लाभ होणार आहे. मत्स्यपालन क्षेत्राला संशोधन व आरोग्य व्यवस्थापनाची नवी दिशा मिळेल असा विश्वास पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
वर्सोवा येथील आयसीएआर–केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (ICAR–CIFE) येथे “हिलिंग फिन्स – महाराष्ट्रातील पहिले बहुविशेषज्ञ फिश क्लिनिक व मोबाईल फिश केअर युनिट” या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा (दि. २२ मार्च) पार पडला. या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (ICAR–CIFE) या संस्थे मार्फत सुरु असलेल्या उपक्रमाची पालकमंत्री यांनी पाहणी केली.
यावेळी या कार्यक्रमाला आमदार हारून रशीद खान, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय श्रीमती ईश्वर्या रणदिवे उपस्थित होते.
हा प्रकल्प जिल्हा नियोजन व विकास समिती मुंबई उपनगर यांच्या निधीतून सुमारे ५० लाख रुपये खर्चाने उभारण्यात येत आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून मत्स्यपालन क्षेत्रातील आजारांचे निदान, उपचार, पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच मोबाईल फिश क्लिनिकच्या माध्यमातून मत्स्यपालकांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन सेवा देण्यात येणार आहे.आयसीएआर– सीआयएफई चे कार्यवाह संचालक डॉ. एन. पी. साहू यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रमुख संशोधक डॉ. मेघा बेडेकर यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.सहाय्यक आयुक्त (मत्स्य) ऐश्वर्या रणदिवे यांनी मानले.