नाशिक : नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने खरात याचा पिस्तुलाचा परवाना अखेर रद्द केला आहे. पोलिस तपासादरम्यान त्याच्या ताब्यातील शस्त्र आणि काडतुसे याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांनी केलेल्या छाप्यात खरातच्या फार्महाऊसमधून एकूण 21 काडतुसे जप्त करण्यात आली. यामध्ये 5 काडतुसे वापरलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही काडतुसे नेमकी कुठे आणि कशासाठी वापरली गेली, याचा सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या गोळ्यांचा वापर प्राण्यांची शिकार किंवा इतर गंभीर प्रकारांसाठी झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक खरातला 15 ऑक्टोबर 2012 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरीनंतर शस्त्र परवाना देण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा परवाना नुकताच 1 जानेवारी 2024 रोजी नूतनीकरण करण्यात आला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या गुन्हेगारी तपासाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, खरातने हे शस्त्र स्वतःच्या सुरक्षेसाठी घेतल्याचा दावा केला आहे. परंतु वापरलेल्या काडतुसांमुळे संशय अधिक गडद झाला असून, पोलिस विविध कोनातून तपास करत आहेत.या प्रकरणातील तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे खुलासे समोर येत असून संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.