पुणे : उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांना नैसर्गिक, ताजेतवाने पेयाची ओळख व्हावी, या उद्देशाने मुरलीधर लोहिया मातृ मंदिर शाळेत एक अभिनव आणि उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना उसाचा रस पारंपरिक पद्धतीने घाण्यावर कसा काढतात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेला प्राधान्य देत करण्यात आली. सर्वप्रथम उसाचा रस काढण्यासाठी वापरण्यात येणारा घाणा स्वच्छ पाण्याने नीट धुऊन घेण्यात आला. त्यानंतर वापरण्यात येणारा ऊसही स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आला. विद्यार्थ्यांसमोरच संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यामुळे त्यांना स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्वही समजले.
यानंतर घाण्यावर ऊस टाकून ताजा, गोड आणि थंडावा देणारा रस काढण्यात आला. स्वच्छ ग्लासांमध्ये हा रस विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या नैसर्गिक पेयाचा आस्वाद घेतला. या उपक्रमामुळे मुलांना पारंपरिक पद्धतीने रस काढण्याची माहिती मिळाली, तसेच उन्हाळ्यातील आरोग्यदायी पेयांचे महत्त्वही पटले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी बर्वे मॅडम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे मत शिक्षकवर्गाने व्यक्त केले. या उपक्रमाचे पालक आणि स्थानिक स्तरावरही कौतुक होत आहे.
