शिरूर : राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने शिव, फुले, शाहू, आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव 2026 निमित्त राज्यस्तरीय भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक जाणीवा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.ही स्पर्धा प्रदेशाध्यक्ष संध्याताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, सरचिटणीस कुमारी मृणाल हेमंत ओव्हाळ यांच्या नियोजनातून संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे.
स्पर्धा दोन गटांमध्ये विभागण्यात आली आहे. 11 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम पारितोषिक 5000 रुपये, द्वितीय 3000 रुपये आणि तृतीय 1000 रुपये असे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण व जडणघडण, राजश्री शाहू महाराज यांचे प्राथमिक शिक्षण विषयक कार्य, महात्मा फुले यांची पहिली मुलींची शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरु – बुद्ध, कबीर, फुले, तसेच स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि पुणे असे विषय देण्यात आले आहेत.
18 ते 25 वयोगटातील स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक 11,000 रुपये, द्वितीय 7000 रुपये आणि तृतीय 5000 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार नीती, राजश्री शाहू महाराज यांचे अस्पृश्यता निवारण कार्य, महात्मा फुले यांचे शिक्षण विषयक कार्य, सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक समाज, तसेच चवदार तळे सत्याग्रह (शताब्दी वर्ष) हे विषय दिले आहेत.
स्पर्धेचे काही महत्त्वाचे नियमही आयोजकांनी जाहीर केले आहेत. निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात असणे आवश्यक असून, तो PDF स्वरूपात पाठवणे बंधनकारक आहे. निबंधासोबत पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व WhatsApp क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत लिहिता येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
निबंध सादर करण्याची अंतिम मुदत 7 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले निबंध 7350785135 किंवा 8999121864 या क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या विचारांना व अभिव्यक्तीला वाव द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
