सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
  • अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स; देवेंद्र फडणवीसांना विचारताच एका वाक्यात विषय संपवून टाकला!
  • भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
 जिल्हा

तंत्रज्ञानाद्वारे जनसेवेचा नवा आदर्श; ठाणे पोलीस आयुक्तालयाचा गौरवपूर्ण प्रवास

डिजिटल पुणे    30-03-2026 14:31:36

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने राज्यातील १२ आयुक्तालयांच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून प्रशासकीय उत्कृष्टतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. २८ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस आयुक्त श्री.आशुतोष डुंबरे व त्यांच्या चमूला या यशाबद्दल प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. हे यश केवळ प्रशासकीय सुधारणा नसून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक आणि जलद सेवा देण्याच्या वचनबद्धतेचे फळ आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाने आपल्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सात मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित केले होते. यामध्ये आयुक्तालयाचे अधिकृत संकेतस्थळ आता अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यात आले असून, ते WCAG 2.1 AA मानकांनुसार अपंग व्यक्तींसाठीही वापरण्यायोग्य बनवले आहे. प्रशासकीय कामात वेग आणण्यासाठी eOffice प्रणालीचा १००% अवलंब करण्यात आला असून, तब्बल २,१७,६५२ फाईल्सचा निपटारा डिजीटल पद्धतीने करण्यात आला आहे, ज्याची टक्केवारी ९८.६५% इतकी प्रभावी आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय ई-ऑफिस प्रणालीच्या वापरत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

नागरिकाभिमुख सेवांमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या २,१९६ अर्जांपैकी २,०९३ अर्ज निकाली काढून ९५.३५% यशाचा दर गाठला आहे. तसेच पी.जी. पोर्टलवर ९९% आणि सिटीझन पोर्टलवर ९९.६८% तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

महिला आणि नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘निर्भय ठाणे’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट (९३२६५२०५२५) ला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत १,९५५ हून अधिक नागरिकांनी १३,८५० वेळा या प्रणालीशी संवाद साधला आहे. यामध्ये ऑनलाईन तक्रारी (३५४), पोलीस ठाणे माहिती (३४७) आणि ट्रॅफिक अपडेट्स (२९१) यांसारख्या सेवांचा समावेश आहे.

गुन्हे नियंत्रण आणि तपासात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GIS (भौगोलिक माहिती प्रणाली) चा वापर हे ठाणे पोलिसांच्या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.

‘त्रिनेत्र’ अॅपच्या माध्यमातून २४,३०० हून अधिक गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली असून, FRS (चेहरा ओळख प्रणाली) द्वारे आरोपींची ओळख पटवणे सोपे झाले आहे.

ITMS प्रणालीद्वारे ६९,२६४ वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून ३६,३८,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, “आपले ठाणे सुरक्षित ठाणे आणि आपले ठाणे निर्भय ठाणे” या GIS आधारित दोन्ही उपक्रमामध्ये गुन्हेगारांच्या घरांचे मॅपिंग झाल्यामुळे व तेथे पोलिस कर्मचाऱ्यांनी नियमितपणे भेटी दिल्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला असून, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात १२% घट नोंदवण्यात आली आहे.

अंतर्गत प्रशासनातही आयुक्तालयाने पारदर्शकता आणली आहे. पोलीस कल्याण निधीच्या १३ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या असून, लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी पोलीस वेलनेस सेंटर आणि सायबर गुन्हे पिडीतांसाठी सायबर समुपदेशन केंद्र (ज्याद्वारे ४५ पिडीतांचे समुपदेशन झाले) कार्यान्वित करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या यशाबद्दल सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन करतानाच, भविष्यातही अशाच समर्पित भावनेने कार्य करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती