मुंबई : डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे “भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलिकडील प्रवास” या विषयावर सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात भारतीय सभ्यतेची अखंडता, तिची तात्त्विक पायाभूत रचना, तसेच आधुनिक काळातील तिचे महत्त्व यावर विविध अंगांनी चर्चा करण्यात आली.या पॅनेलमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम. अय्यर, लेखक अजय चतुर्वेदी आणि यांनी सहभाग घेतला होता तर कार्यक्रमाचे समन्वयन ऐका बॅनर्जी यांनी केले.
चर्चेदरम्यान मान्यवरांनी भारतीय सभ्यतेच्या सातत्याचा उहापोह करताना सांगितले की, भारत ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून ती एक जिवंत चेतना आहे. इजिप्त, मेसोपोटेमिया यांसारख्या प्राचीन सभ्यता कालांतराने लोप पावल्या, मात्र भारतीय सभ्यता आजही अखंडपणे टिकून आहे, यामागील कारणे त्यांनी स्पष्ट केली.भारतीय परंपरेत काळाची संकल्पना ही केवळ घड्याळावर आधारित नसून ती पंचांग, तिथी, नक्षत्र आणि विश्वाच्या गतीशी निगडित आहे. “महाकाल” या संकल्पनेद्वारे भारतीय संस्कृतीत काळाला दैवी स्थान देण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या चक्रात्मक काळरचनेचा उल्लेख करत, वर्तमान काळ हा परिवर्तनाचा टप्पा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मान्यवरांनी पुढे सांगितले की, भारतीय ग्रंथ, पुराणे आणि महाकाव्ये ही केवळ कथा नसून ती तत्त्वज्ञान स्पष्ट करणारी माध्यमे आहेत. या ज्ञानपरंपरेत सूत्र, भाष्य आणि कथा यांचा समन्वय आढळतो, ज्यामुळे तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचते.तसेच, आजच्या काळात भारतीय समाजासमोर ओळख संकट (identity crisis) निर्माण झाल्याचे नमूद करून, मूळ मूल्यव्यवस्थेकडे परत जाण्याची आणि चिकित्सक विचारसरणी विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ज्ञान केवळ वाचनापुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणणे आवश्यक असल्यावर भर देण्यात आला.
या चर्चासत्रातून भारतीय सभ्यतेचा गाभा हा सत्य, धर्म आणि निसर्गाशी सुसंगती यावर आधारित असल्याचे स्पष्ट झाले. भविष्यात भारताची ही तात्त्विक परंपरा जागतिक पातळीवर मार्गदर्शक ठरू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी समन्वयक ऐका बॅनर्जी यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. तसेच अशा प्रकारचे संवाद शैक्षणिक स्तरावर, विशेषतः शाळांमध्ये नेण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
मॅक्स सिटी लिटफेस्ट २०२६’ (Max City Litfest 2026) च्या दोन दिवसांच्या कार्यक्रमात भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.. या महोत्सवात साहित्य, कला, इतिहास आणि संरक्षण अशा विविध विषयांवर मंथन करण्यात आले.
पहिल्या दिवशी प्रामुख्याने मुंबई शहराचे भविष्य आणि भारताच्या गौरवशाली लष्करी इतिहासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे तर दुसऱ्या दिवशी ज्ञान, तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत या विषयांवर विविध मान्यवराने आपले मत व्यक्त केली तसेच या महोत्सवात वंदना कृष्णा यांचे कला प्रदर्शन देखील सर्वांसाठी खुले होते.