बिहार : बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील शीतळा देवी मंदिरात मोठी दुर्घटना घडली असून, भाविकांच्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन किमान आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच डझनभराहून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी आणि शीतला अष्टमीच्या निमित्ताने मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी जमले होते. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत होती. याच दरम्यान अचानक गोंधळ उडाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि धावाधाव सुरू झाली. परिणामी चेंगराचेंगरी होऊन अनेक महिला गंभीर जखमी झाल्या, ज्यापैकी आठ जणींचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, इतर एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वळवण्यात आल्याने मंदिर परिसरात मनुष्यबळ कमी पडल्याचेही बोलले जात आहे.दरम्यान, प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून, नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.