पुणे : छत्रपती शाहू महाराजांनी अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांना आजच्याच दिवशी म्हणजे दि.३१ मार्च १७२६ रोजी पुणे गाव वंशपरंपरेने इनाम दिले. आज या घटनेला तीनशे वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आज श्री देवदेवेश्वर संस्थान , सारसबाग, पर्वती व कोथरूड , लाल महाल उत्सव समिती व कसबे पुणे प्रतिष्ठानच्या वतीने पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या कसबा गणपती मंदिर , नवाकाळ भैरवनाथ , जुनाकाळ भैरवनाथ , श्री बाळोबा (मुंजोबा) देवस्थान , महादोबा देवस्थान , पेशवे गणपती शनिवारवाडा , लाल महाल , तांबडी जोगेश्वरी व सारसबाग सिद्धिविनायक (तळ्यातील गणपती) या ग्रामदैवतांना श्रीफळ , पुष्पहार , महावस्त्र व महाप्रसाद अर्पण करण्यात येऊन पुण्यनगरीचा ३०० वा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे , श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त जगन्नाथ लडकत , लेखक शिवप्रसाद मंत्री , पालखेड युद्ध स्मारक समितीचे प्रशांत गोऱ्हे व विद्या घटवाई , सामाजिक कार्यकर्त्या केतकी कुलकर्णी , शिल्पा भंडारी , शशिकांत धर्माधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

देवस्थानांची महती सांगताना पांडुरंग बलकवडे म्हणाले की , पेशव्यांची या सर्व देवस्थानांवर नितांत श्रद्धा होती आणि प्रत्येक स्वारीच्या वेळी ते या देवस्थानांमध्ये येऊन देवतांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघत असे व जिंकल्यानंतर देखील ते येथे दर्शनाकरिता येत असत.

