नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला असून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून लागू झालेल्या नव्या दरांमुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लघुउद्योगांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात सुमारे 218 रुपयांपर्यंत वाढ झाल्याने विविध शहरांतील दर वाढले आहेत.
या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत सिलेंडरची किंमत सुमारे ₹2078.50 वर पोहोचली आहे. कोलकात्यात हा दर ₹2208 झाला असून मुंबईत ₹2031 इतका झाला आहे. चेन्नईमध्ये सिलेंडर ₹2246.50 दराने मिळणार आहे. याशिवाय पाटणा आणि जयपूरमध्येही दर वाढून अनुक्रमे ₹2365 आणि ₹2031 पर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, एका महिन्यात कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत झालेली ही तिसरी वाढ आहे.दरम्यान, घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
इंधन तुटवड्याच्या अफवा फेटाळल्या
आखाती भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेल तुटवडा निर्माण होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने या बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशात इंधनाचा पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सरकारने इंधन दर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही पावले उचलली असून पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे. तसेच डिझेल आणि एटीएफवर निर्यात शुल्क लागू करून देशांतर्गत उपलब्धता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.एलपीजी आणि पीएनजी पुरवठाही सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मर्यादित परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.