नांदेड : समाजप्रबोधनासाठी कीर्तनाच्या माध्यमातून कार्य करणारे ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. नांदेड शहरातील सिडको परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. वारकरी परिषदेची बैठक आटोपून ते दुचाकीवरून आपल्या बारूळ (ता. कंधार) गावी परतत असताना एका भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर ट्रकखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मधुकर महाराज बारूळकर हे संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. अनेक वर्षांपासून ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृती करत होते. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, नांदेड शहरात जड वाहतुकीवर निर्बंध असतानाही मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेषतः सिडको-हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तलवार बाबा प्रकरणात पोलिस ठाण्यात गोंधळ
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात तथाकथित ‘तलवार बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर करडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घालत धमकावण्याचा प्रयत्न केला. काही समर्थकांनी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची नासधूस केल्याचीही माहिती आहे.या प्रकरणी पोलिसांनी संबंधित समर्थकांनाही ताब्यात घेतले आहे. लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून या बाबावर कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.