पुणे : राज्यात पुढील तीन ते चार दिवस हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता असून हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी प्रतितास राहू शकतो. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील निवडक भागांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातही वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून संध्याकाळी वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यात अलीकडील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील पिके बाधित झाली असून विशेषतः साक्री आणि धुळे तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कांदा, मका, बाजरी तसेच भाजीपाला आणि फळपिकांचेही नुकसान झाले आहे. पपई, डाळिंब आणि आंब्याच्या मोहरावर परिणाम झाल्याने बागायतदार चिंतेत आहेत.
तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव परिसरातही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके आडवी पडली असून प्रशासनाकडून पंचनामे करून लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.
हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.