नाशिक : शिर्डीतील कथित फसवणूक आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता नवा वळण आले आहे. जमीन व्यवहारातील गुन्हा दाखल होताच त्याची पत्नी कल्पना खरात अचानक बेपत्ता झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांना तिचा कोणताही मागमूस लागलेला नाही. तिचा मोबाईलही बंद असल्याने तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिर्डी परिसरातील सुमारे चार एकर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप आहे. मूळ जमीनमालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, कर्ज आणि व्याजाच्या जाळ्यात अडकवून जमीन हस्तगत केल्याचा आरोप खरात कुटुंबावर करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक खरातसह पाच जणांविरोधात फसवणूक आणि सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
SIT ची हालचाल वाढली
गुन्हा नोंदवल्यानंतर लगेचच कल्पना खरात फरार झाली. तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) आणि स्थानिक पोलिसांची स्वतंत्र पथके नाशिक आणि पुणे परिसरात रवाना करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी पथक तिच्या घरी पोहोचले होते, मात्र ती तेथे सापडली नाही. तपासासाठी पोलिसांनी तिच्या मुलालाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
तपासावर प्रश्नचिन्ह
SIT कडून अशोक खरातची चौकशी सुरू असताना कुटुंबातील इतर सदस्यांवर देखरेख का ठेवली गेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.
कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी
शिर्डी परिसरात खरात कुटुंबाची मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. या सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, कल्पना खरात सापडल्यानंतर अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तिचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.