नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरात याच्याविरोधातील सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. एसआयटीच्या विनंतीनुसार न्यायालयाने ही परवानगी दिली होती.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला नाव विचारले असता आवाज स्पष्ट न आल्यामुळे त्याला मोठ्याने बोलण्यास सांगितले. तसेच, “तुमचे वकील म्हणून भाटे वकीलच बाजू मांडत आहेत का?” असा प्रश्न विचारला असता आरोपीने होकार दिला. शेवटी, “तुला काही सांगायचे आहे का?” या प्रश्नावर त्याने हात जोडून “नाही” असे उत्तर दिले.
तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीवर गंभीर आरोप असून त्याने पीडितेवर अत्याचार केल्याचा संशय आहे. यासोबतच काही औषधं देऊन गर्भपात घडवून आणल्याचा आरोपही तपासात समोर आला आहे. संबंधित औषधं कुठून आणली, त्यामध्ये नेमके काय होते, तसेच आधारकार्ड व पॅनकार्ड मागण्यामागील उद्देश काय होता, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी वकिलांनी आरोपीने अंधश्रद्धेचा वापर करून पीडितेला फसवले, तसेच काही जडीबुटीच्या नावाखाली औषधं दिल्याचा मुद्दा मांडला. यामागे मालमत्तेशी संबंधित काही हेतू होता का, याचाही तपास करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली.
दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी याआधीही कोठडी देण्यात आल्याचे सांगत अधिक कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच, प्रकरणातील काही बाबी अद्याप स्पष्ट नसल्याचेही त्यांनी नमूद केले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, 8 एप्रिलपर्यंत तपासासाठी त्याला पोलीसांच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.