सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 जिल्हा

अवकाळी पावसाचा फटका; द्राक्षबाग जमीनदोस्त, तरुण शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

डिजिटल पुणे    03-04-2026 15:32:13

धाराशिव : राज्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला असून फळबागधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः द्राक्ष उत्पादकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील तरुण शेतकरी अक्षय ढगे यांची द्राक्षबाग वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. सुमारे ५० आर क्षेत्रावरील ही बाग काढणीसाठी तयार होती. मात्र रात्री अचानक आलेल्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे संपूर्ण वेल खाली कोसळली.

या बागेतून यंदा ३५ ते ४० टन उत्पादन अपेक्षित होते. सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. हंगामाच्या शेवटी आलेले हे संकट शेतकऱ्यासाठी मोठा आर्थिक धक्का मानला जात आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी अक्षय ढगे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “फक्त द्राक्षबागच नाही, तर आमची सगळी स्वप्नच या पावसाने जमीनदोस्त केली.” बागेची अवस्था पाहून व्यापाऱ्यांनीही माल खरेदीस नकार दिल्याने अडचणीत अधिक भर पडली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबीयांवरही भावनिक परिणाम झाला असून अक्षय यांच्या आजींनीही डोळ्यात पाणी आणत शासनाकडे मदतीची विनंती केली. “कष्टाने उभं केलेलं सगळं निसर्गाने हिरावून नेलं, सरकारने मदत करावी,” अशी त्यांची भावनिक मागणी आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील इतर भागातही अवकाळी पावसाचा फटका बसला असून काही ठिकाणी विजेच्या कडकडाटामुळे जनावरांचे मृत्यू झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्याची प्रक्रिया अपेक्षित असून शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती