पुणे : भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे संस्थेतील गुणवंत व पात्र विद्यार्थ्यांना सहाय्य करण्याच्या उद्देशाने डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती वितरण समारंभ यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण १६६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून, एकूण वितरित रक्कम २० लाखांहून अधिक आहे.
शिष्यवृत्तीचे वितरण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य (प्रशासन) डॉ. सचिन चव्हाण, उपप्राचार्य (संशोधन व मानांकन) डॉ. सुनीता जाधव, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संकुलाचे अधिष्ठाता डॉ. सुहास पाटील, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.ही शिष्यवृत्ती योजना भारती विद्यापीठाचे कार्यवाह व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलपति डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप तसेच भारती विद्यापीठाचे संयुक्त सचिव डॉ. के. डी. जाधव यांच्या पुढाकारातून राबविण्यात आली आहे.
समारंभात बोलताना डॉ. राजेश प्रसाद यांनी चिकाटी, कठोर परिश्रम आणि संधींचा योग्य उपयोग यांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सचिन चव्हाण यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा देत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ध्येयांमध्ये अडथळा ठरू नयेत, ही त्यांची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले,“डॉ. पतंगराव कदम यांचा शून्यातून विश्व उभारण्यापासून ते भारती विद्यापीठाची स्थापना करण्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला उज्ज्वल भविष्य घडविण्यास प्रेरणा देवो.”
ही शिष्यवृत्ती योजना केवळ गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देत नाही, तर त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरते. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांचा सत्कार व आभार प्रदर्शनाने करण्यात आला.शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देणे आणि आर्थिक मदत पुरविणे या हेतूने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दि.३१ मार्च २०२६ रोजी पार पडला.