सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 जिल्हा

पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

डिजिटल पुणे    04-04-2026 12:04:53

कोल्हापूर : सहकार क्षेत्रात महिलांचे योगदान अमूल्य असून, सत्कारमूर्ती महिला भविष्यातील या क्षेत्राच्या ‘आयडॉल’ आहेत. महिलांच्या माध्यमातून सहकार चळवळीला नवी गती देण्यासाठी राज्य शासन आणि फेडरेशन एकत्रितपणे प्रयत्नशील असून, पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच केल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य नागरी पतसंस्था फेडरेशन, मुंबई आणि भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला सहकार मेळावा’, एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आणि ‘सहकार सम्राज्ञी सक्षम महिला, सक्षम सहकार पुरस्कार’ वितरण सोहळा सायबर कॉलेज येथील आनंद भवन सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी सहकार क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या प्रभावाचे कौतुक केले. याप्रसंगी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रूपाराणी निकम, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयते, भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, सहसचिव भारतीताई मुथा, संचालिका नीलिमा बावणे, उपकार्याध्यक्ष अंजलीताई पाटील, गोदावरी अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांसह राज्यभरातील पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सहकारी पतसंस्थांच्या बळकटीकरणावर भर देताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. नागरी सहकारी पतसंस्थांकडून सोने तारण कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना ‘नाममात्र सभासद’ करून त्यांच्याशी व्यवहार सुलभ करण्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक त्या सुधारणांचा प्रस्ताव सहकार आयुक्तांमार्फत शासनास सादर झाला आहे. तसेच तरलता निधीची गुंतवणूक जिल्हा बँकांव्यतिरिक्त अन्य बँकांमध्ये करण्याची मुभा मिळावी, यासाठीही पाठपुरावा सुरू असून लवकरच या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला जाईल.

बचत गटांच्या चळवळीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या युनूस खान यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी अधिक सक्षम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, यावेळी भागीरथी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना ‘सहकार श्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महापौर रूपाराणी निकम यांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, महिलांना सध्याच्या काळात मोठे स्वातंत्र्य मिळत आहे, मात्र आर्थिक सक्षमीकरणासोबतच मानसिक संतुलन राखणेही महत्त्वाचे आहे. उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि चिकाटीचा मंत्र त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमात अरुंधती महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांच्या आर्थिक विकासासाठी अशा चर्चासत्रांचे आयोजन महत्त्वाचे आहे. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध होत असून, प्रशिक्षणाच्या जोरावर जिल्ह्याच्या विकासामध्ये महिलांचा वाटा निश्चितच वाढणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती