उरण :पनवेल तालुक्यातील उलवे नोड मधील समुद्र किनारी वसलेले मोरावे येथील मुरबा गणपती मंदिर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय होता. मात्र या होड्या छोट्या आहेत. गणेश दर्शन घेण्यासाठी प्रवास करताना अबाल-वृद्धांना, माय-लेकींना त्या धोकादायक असल्याचे महेंद्रशेठ घरत यांच्या लक्षात आले होते.
मध्यंतरी एक होडी जरा कलंडली होती, साहजिकच भक्तांमध्ये भीती निर्माण झाली होती. महेंद्रशेठ घरत यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुरबा गणपतीचे दर्शन घेताना गणेशभक्तांना सुरक्षित प्रवासासाठी लाईफ जॅकेट आणि पॅसेंजर बोट द्यायची, असे त्यांनी सौभाग्यवती शुभांगीताईंसोबत मुरबा गणपतीचे दर्शन घेताना बोलून दाखवले होते. त्यामुळे गेल्या वर्षी २९ मे २०२५ रोजी पॅसेंजर बोट आणि लाईफ जॅकेट गणेशभक्तांसाठी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताईंनी आपल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दान केले होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी त्या पॅसेंजर बोटीने प्रवास केला. तेव्हा भक्तांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी (ता.५) वर्षपूर्ती होण्यापूर्वीच संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत दुसरी पॅसेंजर बोट दिली. तिचे लोकार्पण महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोरावे गावातील मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मी फक्त गणेशभक्त नाही तर सेवक आहे. त्यामुळेच भक्तांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला. आज तिचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. मी भक्ती आणि सुरक्षेचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे."महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. ते दर संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जातातच. तसेच बऱ्याच वेळा ते थेट मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतात. पनवेल तालुक्यातील, उलवे नोडमधील समुद्रकिनारी वसलेले मोरावे गाव. येथील मासेमारी करणाऱ्या तीन-चार तरुणांनी स्वकष्टाने चक्क समुद्रात मुरबा गणपतीचे मंदिर बांधले आहे.
राज्य सरकार शिवस्मारक समुद्रात कधी बांधेल माहिती नाही, पण मोरावे गावच्या तरुणांनी भर समुद्रात गणपतीचे मंदिर बांधून मोठेच धाडस केले आहे. महेंद्रशेठ घरत हे दूरदृष्टीचे नेते आहेत. मोरावे गावातील मासेमारी करणारे तरुण स्वयंपूर्ण व्हावेत, त्यांची रोजीरोटी कायम चालली पाहिजे, ते आर्थिकदृष्ट्याही सक्षम व्हावेत, यासाठी त्यांनी आगामी काळात पर्यटनाद्वारे तरुणांना रोजगार कसा मिळेल, याचे व्हिजन डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून महेंद्रशेठ घरत यांनी रविवारी दुसरी पॅसेंजर बोट दिली. गणेशाचे निस्सीम भक्त असलेले महेंद्रशेठ घरत दर संकष्टी चतुर्थीला मुरबा गणपतीच्या दर्शनाला जातात. तेव्हा ते गणपतीचे मनोभावे दर्शन घेतात आणि फ्लेमिंगोंचे थवे पाहण्याचा विलक्षण आनंदही घेतात.
राज्यातील कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला हे जमेल असे नाही, मात्र महेंद्रशेठ घरत यांनाच ते जमते. कारण खरा आनंद कशात आहे, याची मोजमापे त्यांनाच माहिती आहेत. महेंद्रशेठ घरत हे नुसते बोलत नाहीत तर करून दाखवतात. त्यांनी दोन पॅसेंजर बोट मुरबा गणपती मंदिराला दान करून आम्हाला उपकृत केले आहे. आम्ही त्यांचे कायमच ऋणी राहू. त्यामुळे आम्ही मुरबा गणपतीचरणी प्रार्थना करतोय, की गणराया, महेंद्रशेठ घरत यांना समाजकारण आणि सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी अखंड ऊर्जा प्राप्त होऊ दे, अशी भावना मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. यावेळी कॉंग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील,ऍड.अविनाश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, श्रीकांत घरत, रमेश घरत, तसेच एम. जी. ग्रुपचे सदस्य आणि हजारो गणेशभक्त उपस्थित होते.