इराण : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा दिल्यानंतर अमेरिकेच्या आण्विक युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘डूम्सडे प्लेन’ची हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे. हे विशेष विमान नेब्रास्का येथील हवाई तळावर सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. अणू युद्धासारख्या आपत्कालीन परिस्थितीत कमांड आणि नियंत्रणासाठी या अत्याधुनिक ई-4 बी नाईटवॉच विमानाचा वापर केला जातो.
दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा कालावधी आता दीर्घ होत चालला असून, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या शक्तीबाबत बोलताना त्यांनी असा दावा केला की, गरज भासल्यास इराणला अतिशय कमी वेळात मोठे नुकसान पोहोचवता येऊ शकते.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, अशा शब्दांत इराणने या इशाऱ्याची खिल्ली उडवली असून परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच दरम्यान, इराणच्या नेतृत्वाबाबतही एक मोठा दावा समोर आला आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, इराणचे वरिष्ठ नेते मोजतबा खामेनी यांची प्रकृती गंभीर असून ते कोमामध्ये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढला असून, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास हा या संघर्षाचा प्रमुख मुद्दा ठरत आहे. इराणने आपल्या कार्यक्रमावर नियंत्रण आणले नसल्याने इस्रायल आणि अमेरिकेकडून कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.सध्याच्या परिस्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, पुढील काही तास किंवा दिवस निर्णायक ठरू शकतात.