उरण : ग्रामीण भागातील तरुणांमध्ये टॅलेंट आहे; परंतु आजघडीला अनेक गावांत खेळाडू,तरुणांना खेळण्यासाठी हक्काची मैदानेच नाहीत. त्यामुळे 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील तरुणांची हक्काच्या मैदानांअभावी अवस्था झालेली आहे. हे सारे विदारक चित्र बदलायचे असेल तर गावोगावच्या तरुणांनी सावध व्हायल हवे. त्यांनी आपल्या हक्काच्या मैदानांसाठी राजकीय चपला बाहेर ठेवून लढा उभारण्याची गरज आहे. सरकारची वक्रदृष्टी उरण, पेण परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडली आहे. त्यामुळे आजही वेळ गेलेली नाही. तरुणांनी गुरचरण जमीन वा त्या अनुषंगिक जमिनीवर मैदाने तयार करावीत. ती अधिकृत करण्यासाठी मी आपल्या मागे खंबीरपणे उभा आहे. कारण आजपर्यंत अनेक गावांना मी मैदाने मिळवून दिलेली आहेत. मी सर्वसामान्यांसाठी लढत आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपले मत उरण तालुक्यातील कोप्रोली येथे व्यक्त केले. त्यांच्या हस्ते चंद्रशेखर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोप्रोली आयोजित बापूजी देव चषकाचे भव्य उद्घाटन सोमवारी (ता.६) करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन 'मी मराठी' मोठी जुईच्या मैदानावर करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ठाकूर, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील, अलंकार परदेशी, घनश्याम पाटील, ध्रुव म्हात्रे आणि एमजी ग्रुपचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या टेनिस क्रिकेट सामन्यांसाठी चंद्रशेखर ठाकूर, अमेय पितळे, प्रितेश पाटील, अक्षय कोळी, अनिकेत ठाकूर आणि ग्रामस्थांनी मेहनत घेतली आहे. यावेळी उत्कृष्ट सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.