पुणे : भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने माजी विद्यार्थ्यांच्या 'अल्युमनाय मीट -२०२६' चे आयोजन नुकतेच मोठ्या उत्साहात बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेलमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमात जगभरातील ६०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव तसेच मान्यवर पाहुणे म्हणून इंडियन रेल्वेचे वरिष्ठ उप सरव्यवस्थापक डॉ. नरेंद्र पाटील उपस्थित होते. याशिवाय अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्य डॉ. सचिन चव्हाण, उपप्राचार्य डॉ. सुनीता जाधव तसेच माजी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्योग, संरक्षण, कॉर्पोरेट नेतृत्व, शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांसाठी प्रायोजकत्व देऊन तसेच प्रशिक्षण सुविधांसाठी योगदान देऊन संस्थेच्या विकासाला मोठा हातभार लावला. जागतिक उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शन सत्रांद्वारे आणि प्लेसमेंट उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठीही प्रयत्न करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अल्युम्नी पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवोपक्रम, नेतृत्व, सामाजिक प्रभाव, सार्वजनिक सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन प्रकल्पांसाठी प्रायोजकत्व जाहीर केले.
मान्यवर पाहुणे डॉ. नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात शिस्त, चिकाटी आणि आयुष्यभर शिकत राहण्याचे महत्त्व अधोरेखित करत माजी विद्यार्थ्यांना समाजासाठी सक्रियपणे योगदान देण्याचे आणि संस्थेच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.माजी विद्यार्थ्यांच्या यशाने संस्थेची नेतृत्व, नवोपक्रम आणि समाजसेवा घडविण्याची परंपरा अधोरेखित झाली. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून संस्थेने त्यांच्या करिअर, मूल्ये आणि जागतिक दृष्टीकोन घडविण्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावली हे नमूद केले. आयएएस अधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रनिर्मितीत विद्यापीठाचे योगदान अधोरेखित झाले. या कार्यक्रमाने पुन्हा एकत्र येणे, यशाचा आनंद साजरा करणे आणि संस्थेशी असलेले आयुष्यभराचे नाते अधिक दृढ करणे यासाठी एक उत्साही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. 'अल्युमनाय मीट -२०२६' ची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम, संवाद आणि पुन्हा एकदा संस्थेशी जोडले राहण्याच्या दृढ निश्चयासह करण्यात आली.