पुणे (शिरूर) : उन्हाळ्याच्या दिवसांत पर्यटकांची गर्दी वाढत असताना वॉटरपार्कमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील ‘जय मल्हार अॅग्री टुरिझम सेंटर’मध्ये घडलेल्या अपघातात एका महिलेच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या शरीराचा खालचा भाग निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी संदीप नाप्ते (वय ३६) या कुटुंबासह फिरण्यासाठी या ठिकाणी गेल्या होत्या. त्यांनी वॉटर स्लाइडचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला असता, स्लाइडच्या शेवटी असलेल्या टाकीतील पाण्याची पातळी अत्यल्प असल्याचे समोर आले. परिणामी त्या वेगाने खाली येत तलावाच्या तळाशी आदळल्या.
या धडकेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, मणक्याचे अनेक तुकडे झाले असून शरीराचा अर्धा भाग कार्यक्षम राहिलेला नाही.
या घटनेनंतर वॉटरपार्कच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः स्लाइडसारख्या राईड्ससाठी आवश्यक असलेली पाण्याची योग्य पातळी आणि देखरेख राखली गेली होती का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणी संबंधित पर्यटन केंद्राच्या मालक व व्यवस्थापकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.