धाराशिव: राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना त्यांची तुलना नायक चित्रपटातील अनिल कपूर यांच्या भूमिकेशी केली. धाराशिव दौऱ्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
आबिटकर म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेले काम प्रभावी असून त्यांच्या मेहनतीमुळेच राज्यात सत्तांतर घडून आले. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कामगिरीमुळे त्यांचे नाव राज्याबाहेरही मोठ्या प्रमाणात ओळखले जाते, असे त्यांनी नमूद केले. तसेच, शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत शिवसेनेत अद्याप असल्याचेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चेलाही आबिटकर यांनी दुजोरा दिला. “कामगिरीच्या आधारावरच मंत्र्यांना संधी मिळेल. जे निष्क्रिय आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल,” असे संकेत त्यांनी दिले. ‘भाकरी फिरवणे’ हीच शिंदेंची कार्यपद्धती असल्याचेही ते म्हणाले.
याशिवाय, शिवसेनेच्या संघटनवाढीबाबत बोलताना आबिटकर यांनी आगामी काळात अनेक नेते पक्षात प्रवेश करतील, असा दावा केला. मतदार यादी अचूक करण्यासाठी पक्षाकडून विशेष मोहीम राबवली जात असून, पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असावा यासाठी तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.