अकोला : महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मा. श्री. दिलीप स्वामी (भा. प्र. से.) यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
मा. जिल्हाधिकारी तथा प्रभारी व्यवस्थापकीय संचालक महाबीज अकोला, श्रीमती वर्षा मीना (भा. प्र. से.) यांच्या हस्ते हा पदभार औपचारिकरित्या स्वीकारण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने पदभार स्वीकार सोहळा पार पडला.
दिलीप स्वामी यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनातील पारदर्शकता, वेगवान निर्णयप्रक्रिया आणि जनतेशी सुसंवाद यावर विशेष भर देण्यात आला होता.
त्यांच्या प्रशासनातील अनुभव, कार्यतत्परता आणि दूरदृष्टीमुळे महाबीजच्या कामकाजाला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.दिलीप स्वामी यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.