मुंबई : दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंतप्रधानांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, सचिन तेंडुलकर यांनीही अंत्यदर्शन घेत भावूक प्रतिक्रिया दिली.
या पार्श्वभूमीवर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सोशल मीडियावर आशाताईंबरोबरच्या आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सांगितलेल्या एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.नांगरे पाटील यांनी नमूद केले की, ‘उमंग’ कार्यक्रमासाठी त्यांनी आशाताईंना निमंत्रित केले होते. त्या वेळी त्यांनी कोणताही आढेवेढा न घेता सहभाग स्वीकारला आणि कार्यक्रमाला चार चांद लावले. त्यानंतर त्यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.
संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात, प्रेक्षकांच्या आग्रहामुळे गाण्यांची मैफल रंगात आली होती. मात्र वेळेचे भान राखत आशाताईंनी माईकवरून हलक्याफुलक्या शैलीत म्हटले, “माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही,” आणि ठरलेल्या वेळेत कार्यक्रम संपवला. हा प्रसंग नांगरे पाटलांनी विशेषत्वाने सांगितला.
तसेच, आशाताई सामाजिक जाणिवेतूनही अनेकांना मदत करत असत, असेही त्यांनी सांगितले. एका पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत वकिलामार्फत मदत केल्याची आठवण त्यांनी मांडली.नांगरे पाटील यांनी शेवटच्या संभाषणाचाही उल्लेख करत, “त्या मला नेहमी घरी बोलावून प्रेमाने जेवण घालायच्या. आता त्या अचानक निघून गेल्याने मन सुन्न झाले आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
शेवटी त्यांनी आशाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करत, त्यांच्या आवाजातील विविधता, ऊर्जा आणि भावविश्वाची श्रीमंती अधोरेखित केली. “लतादीदीनंतर स्वरविश्व पुन्हा एकदा रिकामं झालं आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या श्रद्धांजलीतून त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.