रायगड : रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड परिसरात ट्रेकिंगदरम्यान घडलेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे ही दुर्घटना घडली.भिवंडी येथील 26 वर्षीय आकाश वाघमोडे हा तरुण रविवारी एकट्याने (सोलो) ट्रेकिंगसाठी इर्शाळगडावर गेला होता. मात्र, ट्रेकिंग करत असताना त्याचा तोल जाऊन तो खोल दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आकाशची दुचाकी गडाच्या पायथ्याशी आढळून आल्यानंतर त्याच्याशी संपर्क होत नसल्याने पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. खालापूर पोलीस आणि खोपोलीतील हेल्प फाउंडेशनच्या पथकाने सोमवारी शोधकार्य राबवले. यावेळी गडाच्या पायथ्याशी दरीत त्याचा मृतदेह सापडला.
घटनेची नोंद करून पोलिसांनी पंचनामा केला असून कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी ट्रेकिंग करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः एकट्याने ट्रेकिंग टाळून गटाने जाणे अधिक सुरक्षित असल्याचेही सांगितले जात आहे.