नाशिक : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अडचणीत आणखी भर पडली असून न्यायालयाने त्याला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर खरातला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता ऑनलाइन हजर करण्यात आले. सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे सुनावणी काही काळ स्थगित ठेवावी लागली; मात्र समस्या दूर झाल्यानंतर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. न्यायाधीशांच्या प्रश्नांना उत्तर देताना खरातने पोलिसांकडून कोणतीही मारहाण झालेली नसल्याचे सांगितले.
सरकारी पक्षाचे वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत आरोपीच्या कृत्यांचे गांभीर्य मांडले. त्यांनी सांगितले की, खरात स्वतःला देवाचा अवतार असल्याचे भासवून महिलांना फसवत होता. प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये गुंगीचे औषध मिसळून त्यानंतर महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. या औषधाचे स्वरूप काय आहे आणि या प्रकरणामागील संपूर्ण यंत्रणा उघड करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बचाव पक्षाचे वकील अॅड. सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध दर्शवला. याआधीही पोलिसांनी अशाच कारणांवर कोठडी घेतली असून तपासासाठी पुरेसा वेळ मिळाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, हा गुन्हा वेगळ्या पीडितेशी संबंधित असल्याचे सरकारी पक्षाने स्पष्ट केल्याने न्यायालयाने अखेर १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
अशोक खरातविरोधात अनेक महिलांनी फसवणूक आणि अत्याचाराचे आरोप करत गुन्हे दाखल केले आहेत. विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून नव्या कोठडीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.