सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
  • मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
 जिल्हा

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

डिजिटल पुणे    15-04-2026 11:09:29

रत्नागिरी,  : जगासाठी उत्तुंग नेतृत्व असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी शासकीय तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल. त्यासाठी शासन मागे पहाणार नाही. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. पुढच्या जयंतीला जिल्ह्यातील पाचही संविधान भवनांचे लोकार्पण करु, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारकासाठी पूर्णपणे सहकार्य लाभेल. अभिमान वाटेल असे काम केले जाईल. बाबासाहेबांची जयंती समाजातील सर्व घटकांची आहे. या विचाराचा आदर्श मंडणगडमधून निर्माण करु, असे महसूल राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.

मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने साजरी करण्यात आली. पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. सामंत आणि राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाबासाहेबांच्या अस्थिकलश स्थानीही पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यांनतर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून शासकीय जयंती साजरी होतेय, याचा मला अभिमान आहे. बाबासाहेबांमुळेच मी आमदार, मंत्री होऊ शकलो. जागतिकस्तरावरचे स्मारक या ठिकाणी होईल. देशातील, परदेशातील अनुयायी, अभ्यासक या गावी भेट देतील. बाबासाहेबांचे विचार युवा पिढीपर्यंत या स्मारकाच्या माध्यमातून पोहचतील. बाबासाहेबांचा विचार हा फक्त एका समाजाचा नाही, तो देशाच्या एकसंघतेचा आहे. ज्या लंडनवाल्यांनी आपल्या देशावर राज्य केले. तेथेच बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक खास पाहण्यासाठी मी लंडनला गेलो होतो. युद्ध नको बुद्ध हवा ही किमया बुध्दांची आहे. बुध्दांचा, बाबासाहेबांचा हाच विचार पुढे घेऊन गेलो तर जयंतीचे सार्थक आहे.

बुध्दांच्या शांततेचा, बाबासाहेबांचा विचार युवा पिढीसमोर ठेवण्यासाठी रत्नागिरीतही बौध्दविहार निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी 10 कोटी रुपये दिले आहेत. नगरपरिषदेनेही बौध्द विहार असा ठराव पास केला आहे. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांनी सांगितले आहे. दुर्दैवाने आपण संघटीत होत नाही. बाबासाहेबांचे संविधान शिकले पाहिेजे, अन्यायाविरोधात संघटिक झाले पाहिजे. विधायक कामांसाठी, देशभक्तीसाठी आणि समाजाप्रती संघर्ष करायला शिकले पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले.

२०० एकर जागेवर पहिली एमआयडीसीः विकास हीच मंडणगडची ओळख – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे हे माझ्या मतदारसंघात आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्यासाठी हे ऊर्जेचे स्त्रोत आहे. येथे येऊन वेगळी ऊर्जा सोबत घेऊन जात असतो. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मंडणगड तालुक्याची नवी ओळख विकासातून करु. बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श मंडणगडमधून निर्माण करु, असे विचार महसूल राज्य मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, पुनर्वसनातील तांत्रिक अडचणी सोडवून स्मारकाला गती दिली जाईल. भूसंपादनाच्या निकषात विशेष बाब म्हणून निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. बाबासाहेबांची जयंती विशिष्ट समाजानेच का करावी, हा प्रश्न मला पडतो. ही मानसिकता बदलण्यासठी आपण काम करु. ही जयंती सर्व समाजाने करायला हवी. बाबासाहेबांच्या विचाराचा हा आदर्श मंडणगडमधून निर्माण होईल. पालकमंत्री डॉ.सामंत यांच्यामुळे गेल्या चार वर्षापासून आंबडवेत शासकीय जयंती होत आहे.

चिंचाळी धरणाचे काम झाले आहे. तालुक्यातील पहिल्या एमआयडीसीला मान्यता मिळाली आहे. 200 एकरच्या जागेवर एमआयडीसी उभी राहणार आहे. तालुक्यातून होणारे स्थलांतर 100 टक्के थांबविण्याचे काम मी हाती घेतले आहे. मागास तालुका ही ओळख पुसून विकासाचा तालुका ही नवी ओळख मंडणगडची असेल, असेही ते म्हणाले.समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी बाबासाहेबांचा पुतळा आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यावरील पुस्तक देऊन दोन्ही मंत्री महोदयांचे स्वागत केले. रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना यावेळी धनादेश देण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे सचिव नरेंद्र सकपाळ यांनी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जि.प. समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बाल विकास सभापती मयुरी शिर्के, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, प्रातांधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, सरपंच दीपिका जाकल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती