पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो हे होते.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी प्राचार्य डॉ. लोबो व उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या कार्याला कृतज्ञतेने नमन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी महात्मा फुले यांच्या दूरदृष्टी, समर्पणभाव आणि समाजोद्धाराच्या कार्याचे प्रभावी विश्लेषण केले. “आजच्या स्वार्थी होत चाललेल्या समाजाला फुले यांचे विचार दिशा देणारे आहेत,” असे सांगताना त्यांनी समाजासाठी कर्तव्यभाव जपण्याची गरज अधोरेखित केली. शेतकरी प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी ‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथाचा उल्लेख करून फुले यांच्या सामाजिक जाणिवेचे महत्त्व विशद केले.
मराठी विभागप्रमुख डॉ. विजय बालघरे यांनी आपल्या मनोगतात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक कार्याचा सखोल आढावा घेतला. ‘गुलामगिरी’, ‘तृतीय रत्न’, ‘ब्राह्मणांचे कसब’अखंड, कुळवाडी भूषण शिवरायांचा पवाडा यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी मांडलेले विचार, तसेच बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य त्यांनी प्रभावीपणे मांडले. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करणे, सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेऊन अस्मिता जागवणे या कार्यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
महात्मा फुले हे केवळ विचारवंत नव्हते, तर कृतीशील समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या आयुष्याची आणि संपत्तीची आहुती देऊन समाज परिवर्तनाचा दीप प्रज्वलित केला. त्यांच्या विचारांचे आचरणात रूपांतर करणे हेच त्यांना खरे अभिवादन असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अविनाश हुंबरे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.