सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
  • मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
 शहर

ज्ञानदीप प्रज्वलित करणारा उपक्रम : अनंतराव पवार महाविद्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन व १८ तास अभ्यास अभियान

डिजिटल पुणे    15-04-2026 15:54:27

पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय समितीच्या वतीने ‘पुस्तक प्रदर्शन व १८ तास अभ्यास अभियान’ हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अंकुश मोरे (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मुळशी तालुका) उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो होते. तसेच श्री. राजेंद्रजी नवाळे (अध्यक्ष, दिव्यांग सेल) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव 

फुले यांच्या वैचारिक परंपरेचा सखोल वेध घेत समाजपरिवर्तनातील त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.प्रमुख पाहुणे श्री. अंकुश मोरे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर होत असलेला प्रभाव अधोरेखित करताना, “त्यांचे कार्य आणि लेखन इतके व्यापक आहे की त्याविषयी बोलणे हीच आपल्यासाठी मोठी जबाबदारी आहे,” असे नमूद केले. त्यांनी पुढे भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला मिळालेली एकता आणि स्थैर्य यावर प्रकाश टाकला. तसेच मुळशी तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीत महाविद्यालयाचे योगदान आणि विद्यार्थ्यांच्या रोजगारनिर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासू वृत्तीचा विशेष उल्लेख केला. “अखंड वाचन आणि ज्ञानार्जनाची तळमळ हीच त्यांच्या यशामागची खरी ताकद होती. त्याच प्रेरणेतून १८ तास अभ्यास अभियान राबविण्यात येत आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. ग्रंथालयात आयोजित पुस्तक प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी सोनाली सरोदे हिने काव्यरूपातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला, तर दिव्या कोकाटे हिने सादर केलेल्या भीमगीताने वातावरण भारावून गेले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे, विभाग प्रमुख डॉ.श्रीकांत देशमुख,डॉ. गणेश चौधरी, प्रा. सोनबा धोत्रे, डॉ. संतोष वाढवणकर, श्रीमती अरुणा पोटे आणि श्री. विशाल मोकाटे यांनी परिश्रम घेतले. कु. संकेत ओव्हाळ या विद्यार्थ्याने छायाचित्रण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय बालघरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश हुंबरे यांनी मानले. या उपक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशीलता, विचारप्रगल्भता आणि सामाजिक भान जागवणारा ठरला.


 Give Feedback



 जाहिराती