पुणे: पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास आरोपीने चिमुरडीला आंबा देण्याचा बहाणा करत आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर मुलीला त्रास जाणवू लागल्याने तिच्या पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला.आईने मुलीशी संवाद साधल्यानंतर संपूर्ण घटना स्पष्ट झाली. रुग्णालय प्रशासनाने त्वरित पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर काळेवाडी पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली.
या प्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाल अत्याचाराच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.पोलिस पुढील तपास करत आहेत.