पुणे : शहरातील रस्त्यांवर दीर्घकाळ पडून राहणाऱ्या बेवारस आणि वापरात नसलेल्या वाहनांविरोधात पुणे वाहतूक पोलिसांनी कठोर मोहीम हाती घेतली आहे. बुधवार (१५ एप्रिल २०२६) पासून सुरू झालेल्या या विशेष अभियानात वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने ओळखून त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे.
या मोहिमेत सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला दीर्घकाळ उभी असलेली, धूळ खात पडलेली किंवा चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने शोधली जातील. अशा वाहनांवर प्रथम नोटीस लावली जाणार असून वाहनमालकांना ती हटवण्यासाठी २४ तासांची मुदत दिली जाईल.
निर्धारित वेळेत वाहन हलवले नाही, तर ते ‘बेवारस’ म्हणून घोषित करण्यात येईल. त्यानंतर पुढील ४८ तासांत संबंधित वाहन थेट जप्त करून निश्चित ठिकाणी हलवले जाईल. जप्त केलेली वाहने परत मिळवण्यासाठी मालकांना दंड भरावा लागणार आहे.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. महापालिका आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त कारवाईत टोईंग व्हॅनची व्यवस्था करण्यात आली असून बेवारस वाहनांसाठी स्वतंत्र जागाही निश्चित करण्यात आली आहे.तसेच नागरिकांनीही परिसरातील अशा वाहनांची माहिती ‘पीटीपी’ अॅपद्वारे पोलिसांना कळवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.