मुंबई : राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून अनेक भागांत तापमान उच्चांक गाठत आहे. विदर्भात सर्वाधिक उष्णता नोंदली गेली असून अकोल्यात तापमान 44 अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. अमरावती आणि सोलापूरमध्येही तापमान 43 अंशांच्या आसपास पोहोचल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उष्माघात आणि उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. तसेच, राज्यासाठी विशेष ‘हीट अॅक्शन प्लॅन’ लागू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेर जाण्याची वेळ आल्यास हलके, सैल कपडे परिधान करावेत तसेच टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी आणि ओआरएसचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. तसेच, कोणत्याही परिस्थितीत मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. मद्यपान आणि कॅफिनयुक्त पेयांचे सेवन टाळण्याचाही सल्ला प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, प्रशासनालाही विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णालयांत आवश्यक औषधसाठा ठेवणे आणि गरजेनुसार शाळांच्या वेळेत बदल करणे यावर भर देण्यात आला आहे. मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावेळी सावली, पाणी आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बाहेर काम करणारे कामगार, शेतकरी आणि अन्य नागरिकांनी सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे, मध्येच विश्रांती घ्यावी आणि उष्माघाताची लक्षणे ओळखून तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.