कोल्हापूर : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन अशोक खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके आणि त्यांचा पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच, कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. खासगी आराम बस आणि कार एकमेकांवर आदळल्याने लागलेल्या आगीत सहा प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. यादगीर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यातील शांतगिरी क्रॉस येथे हा अपघात घडला. या घटनेनंतर स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुरपूर तालुक्यातील शांतगिरी क्रॉस येथे खासगी बस आणि कार यांच्यात जोरदार धडक होऊन बसला आग लागली. या आगीत सहा प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी आराम बस बंगळुरूहून कलबुर्गीकडे जात होती, तर समोरून येणारी कार वेगात होती. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार बसला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. आगीमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी तातडीने बाहेर पडून आपला जीव वाचवला.
या अपघातात मृत्यू झालेल्या सहा जणांचा एकाच कुटुंबाशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्वजण देवदर्शन आटोपून परत येत होते. या घटनेत काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बस मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती.
यादगीरचे पोलीस अधीक्षक पृथ्वीक शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार ओव्हरटेक करताना हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास सुरू आहे.