छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या भीषण अपघातात अशोक खरातच्या'शिवनिका ट्रस्ट'चे उपाध्यक्ष आणि खरात 'याचे अत्यंत निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जितेंद्र शेळके यांच्या पत्नी अनुराधा जितेंद्र शेळकेंचा देखील मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी आहे. ते संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना समृध्दी महामार्गावरती त्यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे.
समृद्धी महामार्गावर धोत्रे गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका कुटुंबावर काळाचा घाला आला आहे. संभाजीनगरहून शिर्डीकडे प्रवास करणारी कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागून जोरात धडकली. या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही कार समृद्धी महामार्गावरून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ अचानक उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, जितेंद्र शेळके हे एका सामाजिक संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, कंटेनर उभा का होता याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.