श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात यात्रेकरूंनी भरलेल्या बसचा गंभीर अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस रामनगर येथून उधमपूरकडे जात होती. दरम्यान, कागोत परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून घसरून पलटी झाली. या भीषण अपघातामागे टायर फुटणे आणि जास्त वेग ही कारणे असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान या घटनेवर नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.या दुर्दैवी घटनेमुळे देशभरातून शोक व्यक्त केला जात असून प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतकार्य सुरू आहे.