सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 DIGITAL PUNE NEWS

बारामतीत 2029 ला ‘पवार विरुद्ध पवार’ची शक्यता? जय पवारांच्या विधानावर रोहित पवार यांची सूचक प्रतिक्रिया

डिजिटल पुणे    23-04-2026 11:04:33

बारामती : बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच 2029 च्या विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भविष्यात ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे संकेत दिले आहेत.

आज माध्यमांशी बोलताना जय पवार यांनी 2029 मध्ये उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांकडून मागणी होत असल्याचे सांगितले, मात्र स्वतःला कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या विधानावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांची आणि पक्षाची इच्छा महत्त्वाची असते आणि त्या निर्णयाचा आदर करावा लागतो.

ते पुढे म्हणाले की, संबंधित पक्ष वेगळा असल्याने त्यांच्या पक्षाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरेल. जर सुनेत्रा पवार निवडणुकीत उतरल्या नाहीत, तर इतर कोणताही उमेदवार मैदानात येऊ शकतो. त्यामुळे 2029 मध्ये सर्वपक्षीय लढत होण्याचीही शक्यता आहे.

रोहित पवार यांनी यावेळी पूर्वीच्या निवडणुकांचा उल्लेख करत, अजित पवार यांच्या काळात तसेच लोकसभा निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. भविष्यातही अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

पवार कुटुंब एकत्र यावे, अशी लोकांची अपेक्षा असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, राजकारणात काही कठोर निर्णय आणि त्याग करावे लागतात, हेही त्यांनी अधोरेखित केले. सत्तेत असलेल्या आणि विरोधात असलेल्या गटांमध्ये समन्वय साधणे सोपे नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

बारामतीतील 2029 ची निवडणूक ही पुन्हा एकदा पवार घराण्यातील अंतर्गत लढतीकडे वळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. तथापि, अशी लढत व्हावी ही जनतेची इच्छा नसल्याचे सांगत, काही राजकीय शक्ती मुद्दाम ‘पवार विरुद्ध पवार’ परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.


 Give Feedback



 जाहिराती