पुणे : कात्रज–कोंढवा परिसरातील बहुप्रतिक्षित रस्ता प्रकल्प अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने मोठी पायरी पार झाली आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्याने पुणे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता गती घेणार आहे.
सुमारे ८४ हजार ४५७ चौरस मीटर जागेच्या भूसंपादनासाठी शासनाने हिरवा कंदील दिला असून, त्यासाठी सुमारे २७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने यापूर्वीच या प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. कात्रज–कोंढवा रस्ता सध्या अरुंद असल्याने येथील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिकांना सुकर वाहतूक, कमी वेळेत प्रवास आणि परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. विशेषतः कोंढवा, कात्रज आणि आसपासच्या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.महापालिकेकडून लवकरच प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार असून, त्यानंतर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.