सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 जिल्हा

मणिपूरमध्ये महिलांचा संताप उसळला; दिवसा रास्ता रोको, रात्री मशाल गस्तीतून शांततेची हाक

डिजिटल पुणे    24-04-2026 15:17:48

मणिपूर : देशभर महिला आरक्षणावर राजकीय चर्चा रंगत असताना मणिपूरमध्ये मात्र गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात महिलांचा आक्रोश पुन्हा उफाळून आला आहे. अलीकडेच एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या हल्ल्यात दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात आंदोलने तीव्र झाली आहेत. 18 एप्रिलपासून सुरू असलेल्या बंदमुळे जनजीवन ठप्प झाले असून परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे.

या पार्श्वभूमीवर ‘मीरा पैबी’ गटातील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. दिवसा त्या रास्ता रोको करत प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत, तर रात्री मशाली घेऊन परिसरात गस्त घालत कायदा-सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहेत. या आंदोलनामागे केवळ निषेध नसून समाजात एकजूट निर्माण करण्याचाही उद्देश असल्याचे दिसून येत आहे.

एका आंदोलक महिलेने सांगितले की, घरकाम, उदरनिर्वाह आणि आंदोलन यामध्ये संतुलन राखणे कठीण असले तरी ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना आहे. दुसरीकडे, सततच्या बंदमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून बाजारपेठा बंद राहिल्याने अनेक महिलांचे उत्पन्नही ठप्प झाले आहे.

दरम्यान, ‘कोऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटिग्रिटी’ या संघटनेने 25 एप्रिल रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मणिपूरमध्ये मे 2023 पासून मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक संघर्ष सुरू असून त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी, जाळपोळ आणि विस्थापन झाले आहे. हजारो नागरिक अजूनही मदत शिबिरांमध्ये राहत आहेत.

राजकीय पातळीवरही बदल झाले असले तरी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. मुख्यमंत्री बदलून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, मात्र तणाव अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत महिलांनी उचललेले हे आंदोलन राज्यातील अस्वस्थतेचे तीव्र चित्र अधोरेखित करत आहे.


 Give Feedback



 जाहिराती