पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ओडिसी नृत्य-आसरा’ या शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा कार्यक्रम शनिवारी, २५ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात पार पडला. सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना डॉ. मधुमिता मिश्रा आणि त्यांच्या शिष्या प्रियांका राऊत , स्मरणिका मोहंती , प्रीतीशा साहू , आरना साळवी , मायरा गुप्ता यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात गुरु डॉ. देबप्रसाद घराण्याच्या परंपरेतील नृत्यशैलीचा देखणा आणि भावस्पर्शी आविष्कार पाहायला मिळाला. मंगलाचरण , स्थायी , पल्लबी, ओडिसी गीत आणि मोक्ष या नृत्य प्रस्तुती सादर करण्यात आल्या.लयबद्धता, अभिव्यक्ती आणि सादरीकरणातील सौंदर्य यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा २८८ वा सांस्कृतिक कार्यक्रम असून, अशा उपक्रमांमुळे शास्त्रीय कलांचा प्रसार आणि संवर्धन होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून रसिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला .