मुंबई : मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात जुनी संपूर्ण टीम दिसली नाही, त्यामुळे कार्यक्रमाच्या टीममध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेषतः निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या अनुपस्थितीमुळे या चर्चांना अधिक उधाण आलं होतं.
या सर्व चर्चांवर अखेर अभिनेत्री श्रेया बुगडेनं स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका मुलाखतीत बोलताना तिनं सांगितलं की, शोचं दुसरं पर्व हे आधीपासूनच मर्यादित भागांसाठी नियोजित होतं. बदलत्या ट्रेंड्स, वाढती स्पर्धा आणि ओटीटीमुळे टेलिव्हिजनच्या स्वरूपात बदल झाल्याने शो सीझन बेस्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.तसंच, निलेश साबळे आणि भाऊ कदम हे त्यांच्या चित्रपटांच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते या पर्वात सहभागी होऊ शकले नाहीत, असंही श्रेयानं स्पष्ट केलं.
टीममध्ये कोणताही वाद नसल्याचं सांगताना श्रेया म्हणाली की, “आमचं बाँडिंग अजूनही तितकंच मजबूत आहे. आम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र भेटतो. भविष्यात पुन्हा एकत्र येऊन नवीन स्वरूपात प्रेक्षकांसमोर येण्याची माझी इच्छा आहे.”यामुळे ‘चला हवा येऊ द्या’च्या टीममध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.