नागपूर : एसटी ही लोकसेवेसाठी निर्माण झाली आहे. त्यामुळे चालक आणि वाहकांनी अधिक कटिबद्धतेने सेवा बजावावी. प्रवाशांच्या सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी बसथांबे आहेत, तेथे बसेस नियमित थांबल्या पाहिजेत, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले. एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी भावनिक नाते जपावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचा शुभारंभ सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सात बसेसना प्रातिनिधिक स्वरूपात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी पालकमंत्री बोलत होते. नागपूर विभागात एकूण २४ बसेस दाखल झाल्या आहेत.
यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी एसटी प्रशासनाला लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून नवीन बसमार्गांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन उमरेड, काटोल, सावनेर आणि रामटेक या चार तालुक्यांमध्ये बससेवेचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पारडसिंगा, धापेवाडा, रामटेक, कोराडी, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस तसेच इतर दुर्गम भागांमध्ये बससेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची, तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र पर्यटन सर्किट विकसित करून वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार आशीष देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार संजय मेश्राम, माजी आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह एस. टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ बसेसची मुख्य वैशिष्ट्ये
• एका रांगेत ३+२ अशी आसन व्यवस्था
• एकूण सुमारे ५५ ते ५६ प्रवासी क्षमता
• ४ सीसीटीव्ही कॅमेरे (आतील व बाहेरील)
• पॅनिक बटन व जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली
• इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले व पीए प्रणाली
• इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम
• सुधारित आसन व्यवस्था व डिझाइन
• जास्त गर्दीच्या मार्गांवर चालविण्यासाठी खास तयार