सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 शहर

‘धोरण कुठवर आलं गं बाई’ : महिला धोरणांवरील चर्चासत्राला चांगला प्रतिसाद ;महिलांच्या सद्यस्थितीचा अभ्यास व्हावा: चर्चासत्रातील सूर

डिजिटल पुणे    28-04-2026 16:12:48

पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे जिल्हा केंद्राच्या वतीने मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी ‘धोरण कुठवर आलं गं बाई’ या महिला धोरणाचा लेखाजोखा मांडणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत हे चर्चासत्र पार पडले.या चर्चासत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चव्हाण, ‘मिळून साऱ्याजणी’ नियतकालिकाच्या संपादिका गीताली वि. मं. यांनी मार्गदर्शन केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर पुणे जिल्हा केंद्राचे सचिव अंकुश काकडे अध्यक्षस्थानी होते. यशवंतराव चव्हाण सेंटर पुणे जिल्हा केंद्राचे कोषाध्यक्ष विशाल तांबे, विकास लवांडे, रवी चौधरी, साधना तीप्पनाकजे, भारती शेवाळे, वृषाली चव्हाण तसेच महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.एड.मेघा सस्ते यांनी सूत्रसंचालन केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सदस्य मनाली भिलारे यांनी आभार मानले.महिला धोरणांच्या अंमलबजावणीतील सध्याची स्थिती, उणिवा आणि पुढील दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली.३० वर्षात चार महिला धोरणे राज्यात अमलात आल्यानंतर स्त्रियांची प्रगती झाली का, सामाजिक स्थान उंचावले का, अशा अनेक मुद्द्यांवर महिलांच्या सद्यस्थितीचा अभ्यास  व्हावा, असा सूर चर्चासत्रात उमटला.


गीताली वि. म. म्हणाल्या,' आजही समता आणि स्वातंत्र्यासाठी स्त्रीला अधिक किंमत मोजावी लागत आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी पुरुषांनी मर्दानगीच्या कल्पना बदलून योगदान दिले पाहिजे. पारंपरिक कल्पनांचे साचे तोडून माणूसपणकडे सर्व समाजाने वाटचाल केली पाहिजे.किरण मोघे म्हणाल्या,' राज्यात महिला धोरणाला वैचारिक चौकट देण्याचे श्रेय शरद पवार यांना दिले पाहिजे. या धोरणात कृती कार्यक्रम आणि कायदेविषयक सुधारणा होत्या. पुढे त्यातील प्रेरणा हरवली. अजूनही स्त्री स्वातंत्र्य संकुचित होताना दिसत आहे. महिला धोरणाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात पडते का हे पाहिले पाहिजे. बदलत्या परिस्थितीत महिला धोरणाचे चिकित्सक मूल्यमापन केले पाहिजे'.


मिलिंद चव्हाण म्हणाले ' घरकाम, स्वयंपाक आणि बालसंगोपनात पुरुषांनी सहभाग घेतला पाहिजे. मुलींचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत झाले पाहिजे. मोफत आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत. फक्त लाडकी बहीण योजना आणि कुंभमेळ्या वर खर्च करून महिलांची सर्वांगीण प्रगती होणार नाही. पितृसत्ताक विचार आणि समाज रचना बदलली पाहिजे.आतापर्यंत राज्यात चार महिला धोरणांची अंमलबजावणी झाली असून त्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. मात्र, काही महत्त्वाच्या बाबींच्या अंमलबजावणीत अद्यापही विविध अडचणी जाणवत आहेत. या अडचणींचा ऊहापोह करून त्यावर उपाययोजना सुचवण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली.


यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला विभागातर्फे राज्यभर ‘धोरण कुठवर आलं गं बाई’ या नावाने चर्चासत्रांची मालिका राबवली जात आहे. या मालिकेची सुरुवात ५ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे झाली होती. त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथेही अशी चर्चासत्रे घेण्यात आली आहेत, अशी माहिती यशवंतराव चव्हाण सेंटर पुणे जिल्हा केंद्र चे कोषाध्यक्ष विशाल तांबे यांनी दिली.


मराठवाड्यातील चर्चासत्रांमध्ये महिला सुरक्षा, महिला शेतकरी, संपत्तीतील अर्धा वाटा, एकल महिला, स्वच्छतागृह आणि महिला-पुरुष लिंगदर अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली होती. पुण्यातील चर्चासत्रातही याच मुद्द्यांना स्थान देत स्थानिक पातळीवरील अनुभव आणि उपाय यांची देवाणघेवाण करण्यात आली.महिला धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा चर्चासत्रांमधून पुढील दिशा निश्चित होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


 Give Feedback



 जाहिराती