पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या सख्ख्या भावाचा, संतोष बोराटे यांचा या चुरशीच्या लढतीत पराभव झाला.
या निवडणुकीत बोराटे यांच्याविरोधात उभे असलेल्या विशाल थोरात यांनी जोरदार कामगिरी करत तब्बल 304 मतांच्या फरकाने विजय मिळवला आणि सरपंचपदाची खुर्ची पटकावली. नांदूरमधील ही निवडणूक चाकणकर आणि त्यांच्या समर्थकांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत रूपाली चाकणकर या विविध कारणांमुळे चर्चेत होत्या. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता त्यांच्या बालेकिल्ल्यात झालेला हा पराभव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.