मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि ‘एनटीपीसी‘ यांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार आहे.
मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण विकास पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा सचिव संजय बेलसरे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, ‘एनटीपीसी’चे विभागीय कार्यकारी संचालक (वेस्टन रिजन) ई सत्या फानी कुमार, महाप्रबंधक (हायड्रो) मनमीत बेदी, एनटीपीसीचे (हायड्रो इंजिनिअरिंग) सहायक महाप्रबंधक डॉ. अनुभव, हायड्रो इंजिनिअरिंगचे उप महाप्रबंधक डॉ. प्रशांत पांडे, डॉ. अरबिंद कुमार, अपर महाप्रबंधक सूर्य प्रकाश केसरवानी, अंबा पीएसपीचे सागर धांडे आदि उपस्थित होते.
जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. कपूर व एनटीपीसीचे विभागीय कार्यकारी संचालक श्री. ई. सत्या फानी कुमार यांनी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी श्री. कपूर यांनी कराराची माहिती दिली.सार्वजनिक खाजगी भागीदारीव्दारे (PPP) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसन करण्याचे धोरण दि.२० डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. आतापर्यंत ५९ सामंजस्य करार झाले आहेत. एनटीपीसी बरोबरचा हा राज्याचा एकूण ६० वा सामंजस्य करार आहे. या धोरणास अनुसरून ६० सामंजस्य करारांद्वारे ८२,०१५ मे.वॅ. वीज निर्मिती क्षमता अपेक्षित असून याव्दारे रु. ४.२८ लक्ष कोटी इतकी गुंतवणूक तर १.३१ लक्ष मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे.
एनटीपीसीचा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठीचा सुधारित सामंजस्य करार
एनटीपीसी लिमिटेड यांनी रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे या उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतर प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेमध्ये ८०० मे.वॅ. ने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) मूळ सामंजस्य करारात सुधारणा करण्याची सूचना केली आहे. याअनुषंगाने एनटीपीसी लिमिटेड यांनी केलेली विनंती विचारात घेता मूळ सामंजस्य करारातील खालील नमूद उदंचन योजनांसाठी सुधारीत सामंजस्य करण्यात आला.
विकासकाचे नाव – एनटीपीसी
➡️सामंजस्य कराराचा दिनांक – ०३.०९.२०२४
➡️सामंजस्य करारानुसार स्थापित क्षमता (मे.वॅ) – अंबा उदंचन जल विद्युत प्रकल्प – ८००
➡️कुंभे उदंचन विद्युत प्रकल्प – १००० मे. वॅ.
➡️पूरक पत्रानुसार सुधारित क्षमता अंबा प्रकल्प – १५०० मे.वॅ. कुंभे प्रकल्प – ११०० मे.वॅ.
➡️पूरक पत्रानुसार मे. वॅ क्षमतेत होणारी (वाढ/घट) -अंबा प्रकल्प – ७०० मे.वॅ., कुंभे प्रकल्प – १०० मे.वॅ.
➡️पूरक पत्रानुसार एकूण क्षमता वाढ (मे.वॅ.) – अंबा प्रकल्प – ८०० मे.वॅ., कुंभे प्रकल्प – १०० मे.वॅ.
➡️ पूरकपत्रानुसार एकूण क्षमतेत वाढ- २६०० मे. वॅ.