पुणे : महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत हडपसरहून अमृत भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पार पडला .हडपसर रेल्वे स्थानकावर आज विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून, या ऐतिहासिक क्षणी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
बनारस–पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस आणि अयोध्या–मुंबई अमृत भारत एक्सप्रेस या गाड्यांच्या शुभारंभ सोहळ्यामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध झाली आहे. या नव्या रेल्वे सेवांचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, “हडपसर परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या नव्या रेल्वे सेवांची गरज होती. या गाड्यांमुळे पुणे आणि उत्तर भारतातील महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, तसेच स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”
कार्यक्रमास नगरसेवक सुनील पांडे, रविंद्र साळेगावकर, नगरसेवक मारुती आबा तुपे तसेच रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना मिळेल आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला.हडपसर रेल्वे स्थानकावर सुरू झालेल्या या नव्या सेवांमुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार आहे.